श्री महागणपती: रांजणगाव गणपती

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे.

श्री महागणपती (रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) ः पुणे-नगर महामार्गावर पुणे-वाघोली-शिक्रापूरमार्गे रांजणगाव हे श्री क्षेत्र शिरूरच्या अलीकडे २१ किलोमीटरवर तर पुण्यापासून ५० किलोमीटरवर आहे. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला "महोत्कट' असे नाव असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे म्हणतात, परंतु ती तळघरात ठेवलेली आहेत. येथील पूजेकरिता ठेवलेल्या मूर्तीच्या बाजूला ऋद्धी-सिद्धी आहेत. हा गणपती नवसाला अगदी हमखास पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

पूर्वाभिमुखी असलेले हे मंदिर तसे अगदी साधे-सुधेच होते. परंतु, बदलासह आता मंदिरात आद्ययावत सोयींसुविधा करण्यात आल्या आहेत. मंदिराच्या आसपासच्या सर्व परिसराचे नव्याने सुशोभीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा सभामंडप सरदार किबे यांनी, तर गाभारा माधवराव पेशव्यांनी बांधला आहे. बांधकाम करताना उत्तम दिशासाधन साधले असल्यामुळे उत्तरायण आणि दक्षिणायन यांच्या मध्यकाळात सूर्याची प्रकाशकिरणे देखील झळाळत्या सोनेरी तेजाचे आवरण लेऊन महागणपतीच्या पूजेसाठी येतात. अशा वेळी शेंदूर लावलेली महागणपतीची मूर्ती अधिकच आकर्षक भासते. सभामंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात गणेशाची डाव्या सोंडेची आसन घातलेली रेखीव मूर्ती आहे. मूर्तीचे कपाळ रुंद असून दोन्ही बाजूंना ऋद्धी-सिद्धी आहेत. या मूर्तीच्या खालच्या बाजूला तळघर आहे. तळघरात महागणपतीची अजून एक लहान मूर्ती आहे. ही गणपतीची मूळ मूर्ती असून, तिला दहा सोंडा व वीस हात आहेत, असे सांगतात.

आराधनेद्वारे गणपतीला प्रसन्न करवून भगवान शंकराशिवाय इतर कोणी आपला वध करू शकणार नाही, असा वर त्रिपुरासुराने मिळवला. या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. सर्व देवांना त्याने पराभूत केले. सर्व देव हिमालयात दडून बसले. त्रिपुरासूर मोठ्या ऐटीत इंद्राच्या आसनावर जाऊन बसला व त्याने आपली वक्रदृष्टी शंकराकडे वळवली. त्याच्याकडे जाऊन त्याने कैलास पर्वताची मागणी केली. त्रिपुरासुराचे दोन सेनापती भीमकाय व वज्रदंत यांनी भूलोकी सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा एका ब्राह्मणाचे रूप घेऊन शंकर त्रिपुरासुराकडे आले व मला चौसष्ट कला येतात, त्या दाखवण्यासाठी आलो आहे, असे सांगितले. त्रिपुरासुराने तुझी कला आवडली तर तू जे मागशील ते देईन असे सांगितले. ब्राह्मणाने तीन विमाने करून दिली व त्याला सांगितले, "यातून तू कुठेही जाऊ शकशील, मात्र शंकराने बाण मारल्यास तुझा नाश होईल. त्रिपुरासुराने आनंदाने त्या ब्राह्मणाला दहा गावे बक्षीस दिली. नंतर त्रिपुरासुर व शंकर यांच्यात तुंबळ युद्ध झाले. शंकराने "प्रणम्य शिरसा देवम्‌' या श्‍लोकाचे स्मरण करून, एका बाणात त्रिपुरासुराचा वध केला. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला ही घटना घडली म्हणून या दिवसाला "त्रिपुरी पौर्णिमा' म्हणतात. शंकराने गणेशाचे जेथे स्मरण केले ते मणिपूर गाव होय. तिथे शंकराने गजाननाची स्थापना केली. आज तेच गाव रांजणगाव म्हणून ओळखले जाते.

भाद्रपद शुद्ध चतुर्थी अर्थात गणेश चतुर्थीला इथे खूप मोठ्या प्रमाणावर गणेशाचा उत्सव साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांच्या कालावधीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला देवाच्या गाभाऱ्यात अगदी मूर्तीपर्यंत जाऊन दर्शन घेता येते, त्यामुळे या काळात दर्शनासाठी भाविकांची इथे रीघ लागलेली असते.

अष्टविनायक स्वयंभू स्थान
भगवान शंकराने उन्मत्त झालेल्या राक्षसाचा वध करण्यासाठी युद्धापूर्वी श्री गणेशाची पार्थिव मूर्ती मणिपर गावी स्थापन करून त्या ठिकाणी श्री गणेशाची घोर तपश्चर्या सुरू केली. या ठिकाणी श्री गणेशाने भगवान शंकराचे तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन दहा तोंड व वीस हात (शस्त्रासह) असे महाकाय विराट दर्शन भगवान शंकराला दिले व त्रिपुरासूर राक्षसाचा वध करणअयासाठी एकाक्षर मंत्र देऊ केला. ज्या ठिकाणी श्री भगवान गणेश प्रगट झाले ते क्षेत्र रांजणगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. तेंव्हापासून या गणपतीस महागणपती संबोधण्यात येते. भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध पौर्णिमेला क्षेत्र भिमाशंकर येथे केला. ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखण्यात येते.

ऐतिहासिक महत्त्व
महागणपती मंदिर हे ४०० वर्षापुर्वीचे असून, त्याच्या दगडी गाभाऱयाचे काम पेशवाईमध्ये झाले असून, सवाई माधवराव पेशवे यांनी हे बांधकाम केले आहे. मंदिराचे उजव्या बाजूला दगडी ओवऱया श्रीमंत पेशव्याचे सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी बांधलेल्या आहेत. लाकडी मंडपाचे काम इंदुर येथील सरदार किबे यांनी केले आहे. मंदिरासमोर दगडी नगारखाना, दगडी वेस व मंदिराच्या पुढे दगडी दीपमाळ प्राचीन वास्तूची आठवण करून देते. चिंचवड येथील महान गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांचे आदेशावरून देव कुटुंबिय येथे महागणपतीची सेवा करीत आहे. श्री मोरया गोसावी यांनी दिलेल्या पंचधातुची उत्सवमुर्ती अजूनही मंदिरात व उत्सवात विराजमान आहे. मंदिरास ब्रिटीश सरकारकडून व नंतर शासनाकडून अल्प अनुदान चालू आहे.

धार्मिक महत्व - इच्छापूर्ती करणारा महागणपती
अष्टविनायकामधील हे आठवे स्थान असून, या महागणपतीचा लौकीक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणून आहे. आजपर्यंत अनेक भाविकांच्या कुटुंबातील, व्यवसायातील अथवा आयुष्यातील अडचणी, संकटे महागणपतीच्या कृपाप्रसादाने दूर झाल्याचे भाविक सांगतात. महागणपतीच्या दर्शनाने संकटे दूर होतात, अडचणीमधून मार्ग निघतात म्हणून भाविकांची १२ महिने याठिकाणी गर्दी असते. हे स्वयंभू स्थान असल्यामुळे रांजणगाव येथे कोठही गणेशमुर्ती वसविली जात नाही. एक गाव एक गणपती हे या ठिकाणी अनेक शतके आहे. श्री मोरया गोसावी यांच्या गणेश सांप्रदायाप्रमाणे येथील धार्मिक कार्यक्रम केले जातात. महागणपतीच्या चार दिशांना श्री देवीची मंदिरे असून, भाद्रपद व माघ उत्सवात या ठिकाणी अनवाणी पायी द्वार यात्रा करण्याची परंपरा आहे. या चारही देवी महागणपतीच्या बहिणी असून, उत्सवात या ठिकाणी देवस्थानतर्फे पुजा आणि यागे केली जाते.

स्थानिक उत्सव
देवस्थानतर्फे वर्षभरामध्ये विविध उत्सव व पारंपारिक सण साजरे केले जातात, त्यामध्ये खालील उत्सव समाविष्ट होतात.

भाद्रपद जन्मोत्सव -
भाद्रपद शु. प्रतिपदा ते भाद्रपद शु. सप्तमी या कालावधीमध्ये स्वर्गातील गणेश जन्मोत्सव साजरा होतो. यामध्ये प्रतिपदा ते पंचमी या दरम्यान मुक्तद्वार दर्शन असते. द्वारयात्रा व पालखीची मिरवणूक या ठिकाणी काढली जाते. ग्रामस्थांचा मोठा सहभाग या उत्सवात असतो.

माघ जन्मोत्सव -
माघ शु. प्रतिपदा ते माघ शु. पंचमी असा हा (पृथ्वीवरील) गणेशजन्म साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात.

ज्येष्ठी जन्मोत्सव व पुष्टीपती विनायक जयंती -
शेष अवतारातील पाताळ नगरीतील जन्माचा हा गणेश उत्सव जेष्ठ शु. तृतीया ते पंचमी साजरा केला जातो. व पुष्टीपती विनायक जयंतीस सत्यविनायक व विशेष पुजा केली जाते.

गणेश ग्रंथ पारायण -
महाराष्ट्रात प्रथमच श्री गणेश ग्रंथ पारायम मंदिरात केले जाते. सात दिवसांचा हा कार्यक्रम ग्रंथ पारायण, निरुपण व किर्तने यांनी परिपुर्ण असतो.

इतर धार्मिक कार्यक्रम -
दर विनायकी चतुर्थीस गणेश याग व सहस्त्रावतने, नवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, काकडा आरती, सामुदायिक सत्यविनायक, गणेशयाग संपन्न होतात.

महागणपती पुरस्कार -
विविध क्षेत्रातील कार्याबद्दल देवस्थानतर्फे महागणपती धार्मिक पुरस्कार, शैक्षणिक पुरस्कार, सांस्कृतिक व कला पुरस्कार, ग्रामगौरव पुरस्कार, देशसेवा पुरस्कार, उद्योजक परस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप र. २१, ०००/-, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.

भाविकांसाठी विविध सोयी
भक्तनिवास -

सध्या भाविकांसाठी अल्पदरात राहण्याची सोय केली असून, ३० खोल्या व ४ हॉल उपलब्ध आहेत. देवस्थान परिसरातच खोल्या असल्यामुळे भाविकांची कायम मागणी असते. दूरध्वनीवरून चौकशी करून, मनीऑर्डरने रक्कम पाठवून खोल्या राखीव ठेवता येतात.

मोदक प्रसाद व चांदी नाणी -
भाविकांना घरी नेण्यासाठी खव्याचे मोदक व ५ ग्रॅम, १० ग्रॅम व २० ग्रॅम मध्ये शुद्ध चांदीची नाणी उपलब्ध आहेत.

प्रसाद भोजन
दररोज दु. १२ ते २.३० व सायं. ७.३० ते ९.०० भक्तांसाठी मोफत प्रसाद भोजन दिले जाते. एकावेळी दोनशे भक्तांची भोजनाची सोय होईल असा प्रसाद भवन हॉल प्रसाद वाटपासाठी सुसज्ज आहे.

धार्मिक कार्यक्रम
अ) सामुदायिक आरती -

भाविकांकरिता रोज सकाळी व सायंकाळी ७.३० वा. सामुदायिक आरती केली जाते. या आरतीमध्ये भाविकांना सहभागी होता येते. ज्या भाविकांना स्वतःचे हाताने आरती ओवाळायची इच्छा असेल, त्यांना रु. ५०० शुल्क भरून आरती करता येते.

ब) सहस्त्रावर्तने -
सकाळी ६ ते ९ या वेळेत भाविकांसाठी सहस्त्रावर्तने देवस्थानतर्फे आयोजित करण्यात येतात. (फक्त ठराविक धार्मिक दिवस व उत्सव सोडून) यासाठी देवस्थान शुल्क ५०० व इतर खर्च घेण्यात येतो.

क) गणेश याग -
यज्ञ मंडपात गणेशयाग करण्याची योजना कार्यान्वीत असून, त्यासाठी ब्राम्हण दक्षिणा, याग साहित्य व २५ यजमानांचे प्रसाद भोजनाची सोय करण्यात येते. त्यासाठी आठ दिवस आगाऊ रु. २१,००० देवस्थान कार्यालयात भरून बुकींग करता येते.

ड) अभिषेक -
भाविकांचे रोज याठिकाणी अभिषेक केले जातात व श्रींचा अंगारा व प्रसाद टपालाने पाठविण्यात येतो. तसेच वार्षिक अभिषेक रक्कम रु. ६०० व एक अभिषेक रु. ५० शुल्क आहे.

देवस्थान पुर्ण प्रकल्प
नगारखाना इमारत -

मंदिराचे मुळ बांधकाम पेशवाई काळातील असल्यामुळे त्याच मराठाशैलीचे बांधकाम व रचना ठेवून, सुंदर व आकर्षक नगारखाना इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये ध्यान धारणेकरिता अथर्व हॉल आहे. पहिल्या मजल्यावर गणेश मुर्ती संग्रहालय तयार करणअयाचे काम चालू आहे. येथून दररोज पहाटे व संध्याकाळी नगारा वाजविण्यात येतो.

दिवाणखाना इमारत -
सांस्कृतिक कार्यक्रम व निवासासाठी ही इमारत बांधण्यात आलेली आहे. ही इमारत अतिशय देखणी व मोहक असून, मराठा वास्तुशास्त्राची वैशिष्ट्ये यामध्ये सामावलेली आहेत. इमारतीमधील सांस्कृतिक सभागृह पेशवेकाळाची आठवण करून देते.

लाकडी सभामंडप -
इंदुर येथील पेशव्यांचे सरदार किबे यांनी ४०० वर्षापूर्वी दगडी मंदिरासमोर लाकडी सभामंडप बांधला होता. त्याचे पुनर्जीवन विश्वस्त मंडळाने केले व त्याच जागेवर त्याच शैलीमध्ये नवीन आकर्षक लाकडी मंडप बांधला. यामुळे मंदिराचे रचनेत कोणताही बदल न होता मंदिराचा आकर्षकपणा व भाविकांना अपेक्षित असलेले वातावरण निर्मिती येथे झालेली दिसते. आज हा लाकडी मंडप भाविकांचे मन मोहून टाकतो.

यज्ञमंडप -
धार्मिक कार्यक्रमातील गणेश याग, यज्ञ इत्यादीसाठी यज्ञमंडपाची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे अग्नेय दिशेला केलेली आहे. त्याचा उपयोग भाविक देवस्थान माध्यमातून घेतात.

पार्किंग व्यवस्था -
भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था महामार्गालगत असून, सध्या पार्किंग अपुरे पडत आहे. विश्वस्त मंडळाने भविष्य काळाचा विचार करून, नवीन अद्ययावत पार्किंग करण्याचे नियोजन चालू आहे.

प्रसाद भवन इमारत -
भाविकांना दररोज सकाळ व संध्याकाळ भोजन प्रसादाकरिता २०० लोकांचा अद्ययावत असे सभागृह व स्वयंपाकगृह या इमारतीमध्ये आहे.  दररोज सर्वसाधारण १५०० भाविक मोफत अन्नप्रसादाचा लाभ घेतात.

स्वानंद उद्यान -
श्री गणेश स्वर्ग लोकीचे स्वानंद, भुतलावर महागणपतीचे मंदिराचे सानिध्यात उद्यान बहरले आहे. अनेक भाविक या नयनरम्य उद्यानाचा व त्यातील आकर्षक कारंज्याचा आनंद लुटतात. शिरूर तालुक्यातील हे पहिले सार्वजनिक उद्यान आहे.

सुवर्णपट व चांदी आरतीपट -
आशियातील पहिले वैदीक वाड.मय सुवर्ण अक्षरात श्री गणपती अथर्वशीर्ष सुवर्णपटाचे रुपाने लिहीण्यात आलेले आहे. ४ फुट बाय ३ फुट लांबी रुंदीचे ४ किलो सोन्याचा वापर करून हा सुवर्णपट व ९ किलो चांदी वापरून श्री समर्थ रामदास रचित आरतीचा पट लाकडी मंडपात बसविण्यात आला आहे. हा सुवर्णपट व चांदीपट भाविकांना सुवर्णयुगात नेतो.

महागणपती दागिने -
विश्वस्त मंडळाने महागणपतीसाठी सोन्याचा हार, सोन्याचे गंध, सोन्याचा मुकूट, सोन्याचे सोंड अलंकार केलेला आहे. महागणपतीसाठी हे दागिने रोज वापरले जातात. लवकरच सोन्याचा कद ही महागणपतीचे वैभव वाढविणार आहे.

महागणपती द्वार यात्रा मंदिरे -
महागणपतीचे चार बहिणीची मंदिरे कर्डे, निमगाव, गणेगाव व ढोक सांगवी येथे आहेत. त्या मंदिराची नवीन सुबक बांधणी करून, आकर्षक मंडप बांधण्यात आले आहेत.

अद्ययात भक्तनिवास इमारत -
सध्याच्या भक्तनिवास खोल्या अपुऱया असल्यामुळे मंदिरालगतच असणाऱया देवस्थानच्या ६१ आर जमिनीवर १०० खोल्यांचे भक्तिनिवास होणार आहे. यामध्ये काही भागात वातानुकुलिती खोल्या राहतील तर काही हॉल असतील. अत्यंत आधुनिक सोयी असणारे हे भक्तनिवास बांधण्याचा खर्च रु. ८ कोटी अपेक्षित आहे.

दर्शनमंडप -
देवस्थानामध्ये महागणपतीचे दर्शनाकरिता येणाऱया भाविकांसाठी संख्या लाखोमध्ये आहे. या भाविकांसाठी दर्शनाची उत्तम सोय होण्याकरिता व भाविकांना दर्शनाकरिता होणार त्रास टाळून अद्ययावत व आधुनिक तंत्रज्ञान वापरून दर्शन मंडप बांधण्यात येत आहे. अष्टकोनी आकाराच्या या दर्शन मंडपाचे वैशिष्ट्ये म्हमजे भाविकांना सर्व बाजूने खुले आकाशा दिसेल व मंदिर परिसर पाहता येईल. आतील बाजूस स्टील रेलिंग असून, त्यामधील प्रत्येक विभागात वृद्धांसाठी बसण्याची सोय, स्वच्छतागृह, गणेश दर्शनाकरिता सी.सी. टिव्ही इ. सोयी केल्या आहेत. प्रत्येक भाविक याठिकाणी सुरक्षा दारातून आत येईल, अपंग व वृद्ध भाविकांकरिता थेट प्रवेशाची योजना आखलेली आहे. अशी ही दर्शन मंडप इमारत चार मजली असून, एकूण खर्च सहा कोटी अपेक्षित आहे. त्यामधील एक टप्प्याचे बांधकाम सुरू होत आहे.

वेदभवन व संस्कार केंद्र -
प्राचीन काळातील आश्रम शाळेच्या धर्तीवर चारही वेदाचा अभ्यास व शिक्षण देणारे केंद्र या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या इमारतीची रचना ही आश्रमासारखी असून, यामध्ये वेद अध्ययन, किर्तने व संगीत यांचे ज्ञान देण्याचे मोठे कार्य योजले आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय चांगली होईल.  या कामासाठी खर्च रु. एक कोटी २५ लाख एवढा अपेक्षित आहे.

मंदिरघाट व नौकानयन -
मंदिराचे मागील बाजूस असणाऱया पाण्याचा प्रवाहाचा उपयोग करून, दुतर्फा दगडी घाट बांधण्यात येणार आहे. अडविलेल्या पाण्यामधून निर्माण होणाऱया जलाशयामध्ये नौकानयनाची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मंदिराची शोभा वाढणार असून, पर्यटन केंद्र विकासासाठी मदत होणार आहे. या प्रकल्पाकरिता दोन कोटी खर्च अपेक्षित आहे.

व्यापारी संकुल -
साठ फुटी रिंगरोड करण्यासाठी ज्या दुकानदारांनी दुकाने हलविण्यासाठी सहकार्य केले, त्यांच्यासाठी ६० दुकाने व दुमजली वाहनतळ अशी व्यापारी दुकानांची इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या व्यापारी संकुलातील दुकाने भाडे तत्त्वावर देण्यात येणार आहेत. या इमारतीकरिता एक कोटी १० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे.

अद्ययावत रुग्णालय -
भविष्यकाळाचा विचार करून पुणे-औरंगाबाद महामार्गावरील ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अद्ययावत रुग्णालयाची नितांत गरज आहे. त्यामुळे दवस्थानतर्फे १०० कॉटसचे रुग्णालय, ऑपरेशन थिएटर व रिसर्च सेंटर बांधण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील रुग्णांस अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल. महामार्गावरील अपघातग्रस्तास तातडीची सेवा मिळू शकेल. या रुग्णालय व संशोधन केंद्र इमारतीचा खर्च अंदाजे २३ कोटी अपेक्षित आहे.

पालखी मार्ग व द्वार यात्रा मार्ग रस्ते -
उत्सवामध्ये महागणपतीची पालखी गावांमध्ये निरनिराळ्या भागात जाते, त्याचप्रमाणे चार गावांना द्वारयात्रेकरिता पालखी जात असते. हे सर्व पालखी मार्ग व द्वारयात्रा मार्ग रस्ते डांबरीकरण करून भाविकांना सोय उपलब्ध करून देण्यासाठी अंदाजे खर्च एक कोटी एवढा अपेक्षित आहे.

शैक्षणिक संस्था इमारत -
मंदिराजवळ अद्ययावत औद्योगिक क्षेत्र विकसित होत असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंजिनियरींग व सायन्स महाविद्यालय सुरू करण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाचा फायदा अनेक ग्रामीण विद्यार्थी घेतील, असे अपेक्षित आहे. या शैक्षणिक इमारतीकरीता अंदाजे खर्च नऊ कोटी एवढा अपेक्षित आहे.

स्वानंत उद्यान पुनर्रचना -
आधुनिक तंत्रज्ञान वापरून थोड्या जागेत पर्यटक व भाविकांसाठी अतिशय आकर्षक न नयनरम्य उद्यान विकसीत करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी अंदाजे खर्च दोन कोटी अपेक्षित आहे.

भारतातील अग्रगण्य प्रकल्प
देवस्थानचे ९६ एकर जमीनीमध्ये अत्यंत नाविन्यपुर्ण व भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणआरा निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा व भारतीय इतिहास व प्राचीन संस्कृती जिवंत करणारी महत्वकांक्षी योजना तयार करण्याचे काम चालू आहे. श्री क्षेत्र शेगांव येथीन "आनंदसागर'चे धर्तीवर, भारतातील आचार-विचार व संस्कृतीचे दर्शन घडविणारे, धार्मिक देवालये, हिंदू धर्माची शिकवण देणारे संस्कृत विद्यापीठ महाप्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामध्ये देवस्थान तर्फे व महाराष्ट्रातील औद्योगिक समुहातर्फे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे रांजणगाव देवस्थानचे नाव जगाच्या नकाशावर कायम राहील.

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे येण्यासाठीचे विविध मार्ग
रस्ता -
पुणे-औरंगाबाद महामार्गावर हे ठिकाण पुण्यापासून फक्त ५१ कि.मी. अंतरावर आहे.

विमानसेवा -
पुणे विमानतळावर उतरल्यावर रस्तामार्गाने केवळ एक तासात देवस्थानमध्ये येता येते. आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे भारतामधून व भारताबाहेरून विमानसेवा उपलब्ध आहे.

रेल्वेसेवा -
पुणे स्टेशन, केडगाव, अहमदनगर व दौंड या रेल्वे स्थानकावर उतरून रस्तामार्गाने देवस्थानामध्ये येता येते.

दूरध्वनी क्रमांक - (02138) 243200, 243201
ई-मेल - contact_mahaganpatiranjangaon@rediffmail.com
ranjangaonganpati@gmail.com
फेसबुक - महागणपतीच्या पेजला लाइक करण्यासाठी इथे क्लिक करा.

Title: ranjangaon ganpati mandir at shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे