शिरूर तालुक्यात पोलिसांनी केला थरारक पाठलाग अन्...

पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करून एका टोळीला पकडले. अंधाराचा फायदा घेऊन पळून जात उसात लपून बसलेल्या सात जणांना गुरुवारी (ता. 25) जेरबंद केले. शिवाय, सुमारे साडेचार कोटी रुपये किमतीच्या सिगारेट पाकिटांनी भरलेले दोन कंटेनर जप्त केले.

शिरूर : पुणे-नगर रस्त्यावर शिरूरजवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करून एका टोळीला पकडले. अंधाराचा फायदा घेऊन पळून जात उसात लपून बसलेल्या सात जणांना गुरुवारी (ता. 25) जेरबंद केले. शिवाय, सुमारे साडेचार कोटी रुपये किमतीच्या सिगारेट पाकिटांनी भरलेले दोन कंटेनर जप्त केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत त्यांना शिरूर पोलिसांची मदत झाली.

दिनेश वासुदेव झाला, सुशील राजेंद्र झाला, मनोज केशरसिंग गुडेन, मनोज ऊर्फ गंजा राजाराम सिसोदिया, ओमप्रकाश कृष्ण झाला, कल्याण सदुल चौहान व सतीश आंतरसिंग झांजा अशी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे असून, हे सर्व मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील आहेत.

महागड्या औषधांनी भरलेला ट्रक पळविल्याप्रकरणी या टोळीविरुद्ध यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, फौजदार अमोल गोरे, सहायक फौजदार दत्तात्रेय गिरमकर यांच्यासह पथक तपास करीत होते. आरोपींची माहिती समजल्यानंतर पथकाने मध्य प्रदेशात देवास व इंदूर भागात जाऊन त्यांची छायाचित्रे मिळवली. त्या आधारे शोध चालू असताना बुधवारी (ता. 24) सायंकाळी या पथकातील काही जण शिरूरहून चौफुल्याला जाताना एक विना क्रमांकाचा कंटेनर त्यांच्यासमोरून भरधाव गेला.

संशय आल्याने पथकाने पाठलाग केला असता फोटोतील वर्णनाचा एक जण कंटेनर चालवत असल्याचे व त्यामागे तसाच आणखी एक कंटेनर असल्याचे लक्षात आले. पथकातील इतरांना; तसेच शिरूर पोलिसांना माहिती देत नाकेबंदी केली. न्हावरे येथून पाठलाग चालू होता. शिरूरच्या सतरा कमानी पुलाजवळ शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे, जितेंद्र मांडगे, सुदाम खोडदे, कल्पेश राखुंडे यांनी नाकाबंदी केली. त्यामुळे संशयितांनी कंटेनर जागेवरच सोडून शेजारील उसाच्या शेतात पलायन केले. पथकाने दोन्ही कंटेनर रात्रीच ताब्यात घेतले. गुरुवारी सकाळी नाकाबंदी करून करून सात जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून बनावट रिव्हॉल्व्हर, चॉपर, चाकू; तसेच वाहनाच्या बोगस नंबरप्लेट, सहा मोबाईल व 13 हजार सहाशे रुपये जप्त केले.

दरम्यान, जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे चार कोटी 51 लाख 58 हजार चारशे रुपये किमतीच्या सिगारेटच्या पाकिटांनी भरलेले 588 बॉक्‍स होते. हा माल रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी कंपनीतून भरून नेत असताना या टोळीने सुपे-मोरगाव रस्त्यावर कंटेनर अडवले. चालकांना बंदुकीचा धाक दाखवून कंटेनर पळवून नेले. ते मध्य प्रदेशात नेत असताना पकडले गेले. अटक केलेले सात जण आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर असून, त्यांच्याविरुद्ध कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, हरियाना, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केली.

Title: pune lcb and shirur police arrested gangster
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे