माझा मालेगाव अनुभव... (सुरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक)

देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू झालेला असताना नाशिकमध्ये मात्र अत्यंत सुखद असे "नो कोरोना इन नाशिक" वातावरण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होते. सुरुवातीपासूनच केल्या गेलेल्या काही नावीन्यपूर्ण उपाययोजना व त्याला नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद याचा परिणाम म्हणून आपण प्रदीर्घकाळ कोरोनामुक्त राहण्यात यशस्वी झालो होतो.

देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू झालेला असताना नाशिकमध्ये मात्र अत्यंत सुखद असे "नो कोरोना इन नाशिक" वातावरण मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत होते. सुरुवातीपासूनच केल्या गेलेल्या काही नावीन्यपूर्ण उपाययोजना व त्याला नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद याचा परिणाम म्हणून आपण प्रदीर्घकाळ कोरोनामुक्त राहण्यात यशस्वी झालो होतो. परंतु 28 मार्च ला पहिला रुग्ण नाशिक मध्ये आढळला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव मध्ये एकदम पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा गतीने कामाला लागल्या....

आपले एकूण कोरोना व्यवस्थापनाचे नियोजन पूर्वीपासून चांगले असल्यामुळे सुरुवातीला याबाबत फारशी काळजी वाटली नाही. परंतु मालेगाव मधील रुग्णसंख्या मात्र वेगाने वाढत जाऊन 100-200- 300 अशाप्रकारे थोड्या दिवसांमध्ये 500 पार झाली आणि मालेगावचा समावेश राज्यातील वाढत्या रुग्ण संख्येच्या शहरांमध्ये झाला. जिल्हा प्रशासन तसेच सर्वच लोकप्रतिनिधींसाठी ही चिंतेची बाब बनली. त्या वेळेला मा पालकमंत्र्यांनी, जिल्हाधिकारी यांनी मालेगाव कडे, महापालिका आयुक्त यांनी नाशिक शहराकडे व जिल्हा परिषद सीईओ यांनी उर्वरित ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित करावे असे बैठकीत सांगितले.

मालेगाव शहराची लोकसंख्या व तेथील जीवनपद्धती पाहता कोरोना संसर्ग होण्यापूर्वीच जिल्हाधिकारी या नात्याने तेथील अनेक व्यवस्था स्थापित करण्याकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले होते. तरीही रुग्ण संख्येमध्ये इतकी भरमसाठ वाढ होईल असा अंदाज कोणासही नव्हता. त्यामुळे या वाढीव संख्येला तोंड देण्यासाठी सर्व फेररचना करणे या कामास मी तातडीने अग्रक्रम दिला

जिल्हाधिकारी यांच्यावर मालेगावची जबाबदारी सोपवली गेल्यामुळे स्थानिक यंत्रणेच्या मानसिकतेवर होणाऱ्या परिणामाचा विचार करून थोडी वेगळ्या पद्धतीची प्रशासकीय रचना करण्याचे मी ठरवले. जिल्हास्तरावर एक इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर आधीच कार्यरत होते व त्याचा अतिशय चांगला उपयोग होता. त्याच धर्तीवर मालेगाव येथे एक स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर तातडीने सुरू करण्यात आले. शासकीय व्यवस्थेमध्ये अनेकविध कामे एकाच वेळी सुरू असतात व त्यात अनेक विभागांचा समावेश असतो. कोणी काय काम करावे याबाबत काहीवेळा संदिग्धता राहून जाते व नेमका त्याचा गैरफायदा घेऊन काही घटक काम टाळू शकतात. असे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये घडू नये याकरता सर्वप्रथम सर्व विभागांना एका छत्राखाली आणून त्या प्रत्येकाची दूरगामी कामे मी ठरवून दिली व त्या दूरगामी कामांचे दैनंदिन कामांमध्ये विभाजन करून पूर्ततेबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली. ह्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाल्यावर या सर्व कामकाजाचे योग्य संकलन व समन्वय होणे सुद्धा गरजेचे वाटल्याने ती जबाबदारीया डॉ पंकज आशिया या स्वतंत्र अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली. या व्यवस्थेमुळे सर्व अधिकारी एका छत्राखाली आले सर्वांना त्यांच्या कामकाजाची रुपरेषा मिळाली व ते करीत असलेल्या कामाची संख्यात्मक व गुणात्मक माहिती श्री आशिया यांच्या माध्यमातून दररोज मुख्यालयाला प्राप्त होऊ लागली. त्या माहितीचे अवलोकन मुख्यालयाच्या स्तरावरील आम्हा सर्व अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे करता येऊ लागले व पुढील कार्यवाही दिशा ठरवता येऊ लागली. एकंदरीतच इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर हे मालेगाव साठी खूप उपयोगी ठरले.

मालेगाव येथील लोकसंख्या व जीवन पद्धती विचारात घेता लॉक डाऊन ची अंमलबजावणी मालेगाव शहरांमध्ये करणे हे अत्यंत आव्हानात्मक काम होते. पोलीस बंदोबस्त देणे हे जसे आव्हान होते तसेच नागरिकांना योग्य सोयी-सुविधा पुरवणे व  विशेष करून रमजान च्या महिन्या मध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक होते. त्यादृष्टीने पेशंटचा रहिवास विचारात घेता अतिशय योग्य प्रकारे कंटेनमेंट झोनची रचना करण्यात आली. हे कंटेनमेंट झोन खूप मोठे अथवा खूप छोटे होणार नाहीत याची विशेष काळजी घेण्यात आली. तसेच त्या झोनमध्ये सर्व जीवनावश्यक गोष्टी नागरिकांना वेळेमध्ये मिळतील अशा प्रकारे किराणा, दूध, वैद्यकीय सेवा अशा सर्व वस्तूंसाठी ची ठिकाणे निश्चित करून देण्यात आली. या सर्वांचे जिओटॅग फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ वेळोवेळी घेण्यात आले. समन्वय साधणे करता स्वयंसेवकांची मदत घेण्यात आली. या प्रदीर्घ काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अत्यंत सुरळीत राहिला हे या सर्व व्यवस्थेचे यश आहे.

देशभर कोरोनाचा धुमाकूळ सुरू झालेला असताना नाशिकमध्ये मात्र अत्यंत सुखद असे "नो #कोरोना इन #नाशिक " वातावरण मार्च...

Posted by shirurtaluka.com on Saturday, June 13, 2020

कोरोना व्यवस्थापन हे सर्व प्रशासकीय व्यवस्थेसाठी अभूतपूर्व काम असल्यामुळे त्याबद्दल जसजसे प्रश्‍न समोर येत तसतसे त्याचे निराकरण करणे गरजेचे झाले होते. तरीदेखील भविष्यात येणाऱ्या बाबींचे पूर्वानुमान चर्चांमधून लावून त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचे सूक्ष्म नियोजन जिल्ह्यासाठी व मालेगाव साठी सतत केले जात होते. नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष कार्यवाही होते किंवा कसे हे बघण्याकरता माहितीचे आदान-प्रदानची अतिशय सक्षम व्यवस्था डिजिटल पद्धतीने करण्यात आली होती. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरद्वारे नेमून दिलेल्या कामांच्या पूर्ततेचे अहवाल दररोज जिल्हाधिकारी यांचेकडे टेलिग्राम द्वारे सादर करणे अनिवार्य होते. त्या अहवालात जर एखाद्या अधिकार्‍याचे काम कमी दिसून आले तर त्या अहवालाच्या स्क्रीन शॉट वरच लाल शेरा देऊन ते समन्वयक यांचेकडे सायंकाळी पाठवले जात जेणेकरून दुसऱ्या दिवशी त्यामध्ये सुधारणा होईल. अशाप्रकारे सुरुवातीपासून दैनंदिन नियंत्रण ठेवले गेल्यामुळे हळूहळू लाल शेऱ्यांचे प्रमाण कमी होत गेले व शेवटी रोजच्या रोज कामांचा निपटारा करणे हे सर्व अधिकाऱ्यांना सवयीचे झाले.

मालेगाव नाशिक पासून जवळपास शंभर किलोमीटर दूर असल्याने त्या ठिकाणी साधनसामग्रीची वानवा असणे स्वाभाविक होते.  विशेष करून त्याठिकाणी अधिकारीवर्ग कमी प्रमाणात उपलब्ध होता. साधन सामुग्री देखील अल्प प्रमाणात उपलब्ध होती. प्रथमतः मालेगाव जणू मुख्य केंद्र समजून जिल्हा स्तरावरील सर्व सामुग्री तिकडे पाठवायला सुरुवात करण्यात आली. त्यासोबतच जिल्हा स्तरावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आदेश काढून मालेगावला रवाना करण्यात आले. यामध्ये महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद अशा सर्व अधिकाऱ्यांचा समावेश होता. श्री पंकज आशिया कळवण येथील प्रांत अधिकारी यांना समन्वयक म्हणून पाठवण्यात आले तर डॉक्टर निखिल सैंदाणे हे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय व्यवस्थेचे समन्वय करण्याकरता पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे डॉक्टर गोविंद चौधरी हे संसर्ग शास्त्रज्ञ मालेगावला विशेष अभ्यासासाठी व उपाययोजना सुचविण्यासाठी पाठवण्यात आले. त्यांच्या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी श्री अंतुरलीकर , तहसीलदार श्री आवळकंठे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र शिंदे असे अनेक वरिष्ठ अधिकारी वेगवेगळी जबाबदारी देऊन मालेगावी पाठवण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी त्यांचे आस्थापनेवरील अनेक डॉक्टरांच्या सेवा मालेगाव साठी उपलब्ध करून दिल्या. पोलीस विभागाने सुद्धा अनेक अधिकारी मालेगाव येथे तैनात केले. या सर्व अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जबाबदारीचे योग्य नियोजन तर केले तसेच पूर्तता देखील केली.

मालेगाव मधील समस्या इतकी ठळकपणे समोर आली की सर्वांचेच लक्ष तिकडे वेधले गेले होते. अशा वेळेला प्रशासकीय पातळीवरून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींकडून पाठिंबा मिळणे ही गोष्ट फार मोलाची होती. मालेगाव मध्ये केल्या जाणाऱ्या विविध प्रयत्नांची माहिती मा  मुख्यमंत्री महोदय स्वतः अनेकदा दूरध्वनी करून घेत असत. त्याच बरोबर त्या ठिकाणी मदत होईल अशा विविध व्यक्ती चे संदर्भ देत असत. मा मुख्यमंत्री महोदयांच्या आश्वासक वार्तालापाने आत्मविश्वास खूप वाढत असे. मा शरद पवार साहेब नियमित पणे मार्गदर्शन करीत असत आणि त्यांनी दिलेले संदर्भ खूप उपयोगी ठरत असत. वरिष्ठ पातळीवरून एका शहराची घेतली जाणारी अशा प्रकारची काळजी कामाच्या जबाबदारीची अधिक जाणीव करून देत असे. मा महसूल मंत्री, मा पालकमंत्री नियमित आढावा घेऊन अडचणी दूर करीत असत. मा आरोग्य मंत्री यांनी तर मिशन मालेगाव अशी धडक मोहीम घेतली. मालेगाव येथील स्थानिक मंत्री श्री दादा भुसे यांनी  कार्यकर्त्याच्या उत्साहाला मागे टाकेल अशा हिरीरीने सर्व बाबींमध्ये सहभाग तर घेतलाच परंतु समोर येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याकरता हरप्रकारे मदत केली. खासदार श्रीमती सुप्रियाताई सुळे यांचे ट्विट खूप उत्साह वाढवत असे. सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व आमदार खासदार यांनी कोणत्याही प्रकारे भेद न ठेवता समस्या निराकरण करण्यासाठी सहकार्य केले. मा मुख्य सचिव मालेगाव कडे विशेष लक्ष देत होते सतत मार्गदर्शन करीत होते. मा पालक सचिव, मा विभागीय आयुक्त यांचे मार्गदर्शन नियमित पणे मी घेत असे व ते खूप उपयोगी होई. अनेक वरिष्ठ सचिव नियमित संपर्क करीत असत. ज्या ज्या वेळी शासनाकडून विविध प्रकारचे आदेश आवश्यक होते ते आदेश तातडीने पारित करून मिळण्यामध्ये या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावली. पावरलूम सुरु करणे असो अथवा लॉक डाऊन उठवताना उपस्थित झालेले मुद्दे असोत, हे सर्व मोठे निर्णय खूप शीघ्रतेने घेण्यात आले.  या भरघोस पाठिंब्यामुळे मालेगाव येथे करावयाच्या सर्व उपाययोजनाना खूपच चांगले बळ मिळाले.

मालेगाव येथील लोकसंख्या तसेच जीवन पद्धती ही विशिष्ट प्रकारची आहे. सुरुवातीला तर एकंदरीत कोरोना विषयाबद्दल या भागात खूप गैरसमज असल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिक सर्वेक्षणांमध्ये देखील सहकार्य करीत नसत. त्यातून आजारी रुग्णांची माहिती संकलित करण्यात देखील मोठी अडथळ्यांची शर्यत करावी लागली व त्याचे दुर्दैवी दुष्परिणाम काही नागरिकांना सहन करावे लागले. ही बाब विचारात घेऊन हळूहळू स्थानिक नागरिकांच्या मनावर प्रभाव टाकू शकणाऱ्या व्यक्तींचे सहकार्य घेण्याचे ठरवण्यात आले. त्याकरता स्थानिक महत्वाचे लोक विशेषता धर्मगुरू, वैद्यकीय व्यावसायिक ई चे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते मोठ्या प्रमाणावर विविध माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन नागरिक हळूहळू या सर्व उपाय योजनांमध्ये सहभागी होऊ लागले.  रमजानचे रोजे सुरू असताना स्वाब घेताना रोजा  मोडेल किंवा काय अशी शंका व्यक्त होत असल्यामुळे सेहरी किंवा इफ्तारी दरम्यान स्वाब घेतले जात असत. त्याचप्रमाणे आजाराचे निदान करण्यासाठी एक्स-रे ची अतिरिक्त सुविधा देखील मालेगाव येथे सुरू करण्यात आली.

करोना च्या रुग्णांवर उपचार कशा प्रकारे करावे याबाबत देखील शासनाच्या अनेक मार्गदर्शन सूचना होत्या. त्याप्रमाणे सर्व कार्यवाही शासकीय रुग्णालयांमध्ये केली जात होती. काही प्रकरणांमध्ये कोरोनाची लक्षणे स्पष्ट नसल्यामुळे अथवा अत्यल्प लक्षणे असल्यामुळे काही लोक घरीच उपचार घेत होते. अशा लोकांनी त्यांच्या उपचार पद्धतीनुसार योग्य ते उपचार घेतले. त्यासाठी आवश्यक साधनसामुग्री त्यांना उपलब्ध होईल याची तजवीज करण्यात आली.  त्याद्वारे सुद्धा अनेक रुग्ण या संसर्गापासून सुरक्षित राहिले अथवा अल्प लक्षणे असतानाच बरे झाले असे दाखले अन्य नागरिक देत आहेत. आज देखील मालेगाव मध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जवळपास 80 टक्के च्या आसपास आहे व हे प्रमाण देशातील सर्वाधिक प्रमाणात मध्ये गणले जात आहे.

मालेगाव बाबत सुरुवातीपासूनच अनेक गैरसमज पसरलेले असल्यामुळे या ठिकाणी घडलेली कोणती घटना ही अतिरंजित करून अन्य ठिकाणी सांगितली जात असे. बऱ्याच वेळेला तर कोणतीही वाईट घटना घडलेली नसताना सुद्धा अशी घटना घडली असल्याचे चित्र रंगवले जात असे. त्यामुळे वास्तविक काय सुरु आहे याची व्यवस्थित माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे दृष्टीने व आरोग्य व्यवस्थेवर लोकांचा विश्वास स्थापित करण्याचे दृष्टीने वृत्तपत्र, प्रसारमाध्यमे, खाजगी चॅनेल्स या सर्वांना वेळोवेळी जिल्हाधिकारी म्हणून मी स्वतः व्हिडिओद्वारे, ऑडिओ द्वारे अथवा मेसेज देऊन वारंवार सद्यस्थितीबाबत अवगत करीत असे. या पद्धतीमुळे अनधिकृत माहिती अथवा अफवांना आपोआपच पायबंद बसला. काही वेळेला सकृद्दर्शनी दिसणाऱ्या आकडेवारीतून चुकीचे निष्कर्ष देखील काढले जातात. त्यामुळे माहितीचा योग्य अर्थ लावणे देखील गरजेचे असते. ही माहिती देत असताना या माहितीचा अर्थ कसा लावला जावा याबाबतचे विश्लेषण देखील मी करीत असे. ही सर्व कामे स्वतः लक्ष देऊन केल्यामुळे माहितीचे आदान-प्रदान योग्यप्रकारे होऊ शकले. या मध्ये माहिती-तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर करण्यात आला. योग्य निर्णय घेण्यासाठी माहिती अद्यावत असणे अत्यंत गरजेचे असते. बऱ्याच वेळा माहिती तयार करण्यामध्येच यंत्रणेचा खूप वेळ जातो. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये असा वेळ दवडणे परवडणारे नसल्यामुळे मुळात माहिती वेगळ्याने कोणालाही तयार करायला लागू नये व माहिती आपोआपच कामातूनच तयार व्हावी अशा पद्धतीची एक अत्यंत सक्षम यंत्रणा विविध माहिती तंत्रज्ञानाच्या साधनांद्वारे स्थापित करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही बैठकीसाठी अथवा प्रेस साठी अथवा अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी, कोणतीही माहिती वेगळ्याने तयार करण्यामध्ये यंत्रणेचा वेळ गेला नाही. कॉम्प्युटर वर माहिती सतत उपलब्ध राहिली व या अद्ययावत माहितीचा वापर करून वेळोवेळी योग्य ते निर्णय घेणे शक्य झाले.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्व शासकीय विभाग, सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा अत्यंत सक्रिय सहभाग राहिला. विशेषतः प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी नियमित कार्यपद्धती बाजूला ठेवून हे जणू आपल्या स्वतः वर आलेले संकट आहे असे समजून प्रयत्नांची पराकाष्टा केली. मी स्वतः जिल्ह्याचा पदभार असताना देखील मालेगाव येथे मागील दीड ते दोन महिन्यात मी जवळपास दररोज गेलो जितक्या वेळा मी संपूर्ण दीड वर्षांमध्ये अन्य कुठल्याही ठिकाणी गेलेलो नाही. नाशिक येथे असतानादेखील मालेगाव येथील परिस्थितीबाबत विविध विषय हाताळण्यात मध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च होईल. पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ आरती सिंग यादेखील पूर्णवेळ मालेगाव येथे उपलब्ध होत्या. महापालिका आयुक्त श्री दीपक कासार हे स्वतः कोरोना ग्रस्त होऊनही त्यांनी त्या आजारावर अत्यल्प काळात मात केली व मालेगाव देखील कोरोना मुक्त करण्याचा संकल्प सोडला. नंतरच्या टप्प्यामध्ये श्री सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक यांनी स्वतःहून मालेगाव येथे काम करण्याची तयारी दर्शवली व समन्वयाची भूमिका प्रभावीपणे पार पाडली. स्थानिक पोलीस अप्पर अधीक्षक श्री संदीप घुगे आणि उपविभागीय अधिकारी श्री विजयानंद शर्मा यांच्या घरामध्ये त्यांच्या नूतन बाळाचे आगमन या दरम्यान झाले.  परंतु कर्तव्यावर असल्यामुळे आपल्या  बाळांना जन्म झाल्यानंतर तातडीने ही मंडळी भेटू शकली नाहीत. त्याची कोणतीही खंत न बाळगता त्यांनी कर्तव्याकडे लक्ष दिले. डॉ हितेश महाले हे मध्यंतरी आजारी होऊन सुद्धा अत्यल्प काळात पुन्हा हॉस्पिटलमध्ये रुजू झाले व आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण बरे करण्याच्या कामी लागले. रुग्णांना डिस्चार्ज देत असताना अनेक रुग्णांनी श्री महाले यांच्या बद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. मुख्यालय असलेल्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य चोख पार पाडली. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर मध्ये काम करणारे जवळपास सर्व अधिकारी हे पूर्णवेळ मालेगाव येथे थांबून त्यांना नेमून दिलेल्या कामाकडे लक्ष देत होते. अहवाल पाठवत होते व त्यावर दिलेल्या सूचनांची पूर्तता करत होते.

एकेकाळी एक मोठे आव्हान म्हणून सर्वांसमोर उभी ठाकलेली मालेगाव येथील परिस्थिती वरील सर्व प्रयत्नांचा भाग म्हणून आज एक यशोगाथा म्हणून समोर येत आहे व इतरांसाठी सुद्धा एक मार्गदर्शक ठरू पाहत आहे. कोरोना व्यवस्थापन ही एक जटिल प्रक्रिया आहे व त्यामध्ये अनेक विभागातील अनेक ज्येष्ठ कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्या मोठ्या योगदानातून आज परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत आहे. मालेगाव मध्ये राबलेल्या प्रत्येकाचेच ते निर्विवाद श्रेय आहे.

शासन-प्रशासन व नागरिक यांनी मनावर घेतले तर कोणत्याही आपत्तीला तोंड देता येऊ शकते हेच या निमित्ताने मला अधोरेखित करायचे आहे.

- सुरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक.

Title: nashik districkt collector suraj mandhre malegaon experience
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे